मंगळवार, १५ जून, २०१०

घाटघर घाट माथा

कळसुबाई डोंगराचा निरोप घेऊन गाडी सरळ पुढे येते आणि थोडीशी रेंगाळते तोच आहे "वारांघुशी फाटा" त्याची डाव्या बाजूची वाट जाते आमच्या राजूरला आणि उजव्या बाजूने आपण प्रवेश करतो एका अनोख्या सृष्टी सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या घाटाजवळ त्याला च घाटघर असे म्हणतात. घाटांचे घर आशीच त्याची शब्द्फोड आणि अशीच त्याची रचनाही आहे. शेंडी गावाच्या अलीकडून उजव्या हाताच्या रस्त्याने वळायचे आणि थेट जायचे घाटघर ला रस्ता कसा हे विचारू नका पण रस्त्याच्या बाजूचे दृश्य वेड लावणारे असेच वळणाचा रस्ता संपूर्ण प्रवरेच्या पाणलोट क्षेत्राच्या कडेकडेने जातो आणि दुसर्या बाजूला अगणित झरे आपली वाट अडवतात प्रत्येक झर्याचे आपलेच सौंदर्य आहे. जणू निसर्गाच्या घटातून ओसंडणारे अमृत त्या झर्यातून निसर्ग आपल्यासाठीच घेऊन येत आहे. घाटघर या नावाचे 'घटघर' हे नाव असले पाहिजे असे वाटून जाते . हे सारे झरे धरण साठ्यात जाऊन सामावतात आणि आपल्याला भूगोल आठवतो..माथ्यावर सह्यकडे गर्द सागवानी झाडे आहेत. आपण भारावून गाडी चालवतो आणि गाडी वळणे घेऊन न थकता पुढे गेली कि एक पूल लागतो तिथेच आता घाटघर-उदनचंद प्रकल्पाचे काम चालू आहे असो . आपण वरचा चढ पार केला कि घाटमाथ्यावर येतो हाच घाटघरचा कोकणकडा. धुक्याच्या लहरींवर तरंगणारा हा कडा म्हणजे स्वर्गच आहे. खरच हा अतुलनीय अनुभव घ्यायला व डोळ्यात साठवायला एक वेगळीच नजर लागते. भूरू भूरू पावसाच्या सारी अंगावर घेत धुक्याच्या लोंढ्यात स्वतःला झोकून द्यायला तुम्हाला इथेच जावे लागेल. आता तिथे एम. टी. डी. सी. ने तुमच्या राहण्याची सोय केली आहे. वरती सुंदर कोटेजेस आहेत. पावसाळ्यात धुक्यात असणारा कोकण कडा एरवी पहाल तर सुंदर दरी आहे जी शहापूर पासून जवळच आहे तिथून छोटीशी नदीही आहे व एक झराही वाहताना दिसतो. कोकण म्हणजे ठाणा जिल्हा तेथूनच खाली सुरु होतो.