मंगळवार, ३० मार्च, २०१०

'माहेरची वाट'

डोंगराच्या कुशीत शिरणारा वळणदार नागमोडी रस्ता लागला, कि गाडी वळणा वळणावर हेलकावे घेऊ लागते,आणि मग सुरु माझ्या माहेरच्या वाटेचा खरा प्रवास. सागवान झाडांचे जंगल, उतरत्या छपरांचे ,गवती छताचे घर असलेली एखादी टुमदार वाडी, दत्त महाराजांच्या पायथ्याशी पहुडलेल्या कुत्र्यागत, डोंगराच्या पायथ्याशी शांत, निवांत भासते. शेतातल्या भाताचा दुधाळी सुगंध आसमंतात घुमत आसतो. शेतात शेतकरी त्याच्या कुटुंबा सोबत राबत असतो. पावसाळा असेल तर डोईवर इरलं असतं( म्हणजे पावसापासून बचाव होण्यासाठी घोंगडी वजा लाकडी पट्ट्यांचे बनवलेले छत.) आणि आपली गाडी वळण वळणं घेत मजल दरमजल करीत असते. सगळी कडे हिरवी दुलई पांघरलेले सह्याद्रीचे डोंगर आपल्याला वेड लावतात. शेत शेतातून वाहणारे झरे शेवटी रस्त्याच्या कडेला येऊन कोसळतात आणि त्याच्या खळखळाटात आपल्याला डोंगराचे गीत ऐकवतात. सह्याद्रीच्या कुशीत शिरताना आपल्याला तो त्याच्या बाहुपाशात सामावून घेतो आणि मग त्याच्या सौंदर्याच्या एक एक छटा दाखवायला सुरवात करतो. इगतपुरी ,घोटी सोडली कि याचा प्रत्त्यय आपल्याला यायला लागतोच. मी माझ्या पुढील काही लेखांमधून ह्याच परिसरातील अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणांची मला माहित आहे तेव्हडी माहिती आपणास सांगणार आहे.
'टाकेद'
प्रथम आपल्याला लागते ते 'टाकेद'. हा संपूर्ण परिसर ‘रामाच्या’ पदस्पर्शाने पावन झालेला आहे. जवळच नासिक पंचवटी असल्याने ‘टाकेद’ हे पवित्र तीर्थ स्थान आहे. हे गाव म्हणजे जटायु पक्षाचे पंख छाटले ते स्थान आहे. सीता हरण झाले तेंव्हा जटायु पक्षाने सीतेचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकला आणि हा पक्षी सीता मातेच्या मदतीला धावून आला त्याने रावणाशी झुंज दिली पण चलाख रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटले व तो या पवित्र स्थळी येऊन पडला.म्हणून या स्थानाला आणण्य साधारण महत्व आहे. त्या ठिकाणी एक जिवंत झरा आहे. महादेवाचे एक सुंदर मंदिर असून त्या समोर एक कुंड आहे. हे सर्व काळ्या पाषाणाचे आहे. तेथे बाहेर एक दगडी पिंड असून त्याच्या आत एक गोल गुळगुळीत दगड आहे, तो दगड जो एका हाताने वर काढतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी तिथली समजूत आहे. हा संपूर्ण परिसर सुंदर वृक्षांनी वेढलेला , अतिशय शांत आणि रमणीय आहे. झर्याचे पाणी वर्षाच्या बाराही महिने नित्य वाहत असते. त्याचा झुळझुळ असा आवाज आजही माझ्या कानात घोळतो आणि त्या परिसराची ओढ लावतो.
'कळसुबाई शिखर
' आपण ‘वासाळी’ घाट माथ्यावर आलो कि ‘नासिक’ जिल्हा संपून, ‘अहमदनग’ जिल्हा सुरु होतो. आणि आपले भव्य स्वागत होते ते सह्याद्री पर्वत रांगांमधील सर्वात उंच शिखर 'कळसुबाई.’ गाडी बारी गावाजवळ थांबते आणि मान उंचावून पहिले कि वर दिसते ते उंचच - उंच कळसुबाई शिखर. त्याच्या टोकावर ' कळसुबाई' चे मंदिर असल्याने त्याला हे नाव पडले आहे. बारी गावचा परिसर ह्या देवीच्या छत्र छायेत बहरलेला जाणवतो. बारी गावातून आपण शिखराच्या दिशेने प्रवास सुरु करतो. शेता शेतातून वाट काढत आपण पायथ्याशी पोहोचतो तिथे एक सुंदर देवीचे मंदिर आहे. कळसुबाई देवी आपल्याला जशी सुरवातीला भेटते तसेच शिखर सर केल्यावरहि तिचे मंदीर आहे.निसर्गाला आपल्याकडे देवी देवतांचे वरदान मानले जाते. त्याचा प्रत्यय या डोंगर माथ्यावरील छोट्याश्या पण सुरेख मंदिरावरून येतो. अंदाजे सोळा हजार फुट उंचावर असलेले हे मंदिर म्हणजे भक्तांच्या अगाध श्रद्धेचा साक्षात चमत्कारच वाटतो. आहो जेथे आपण स्वतःला सहजा सहजी जाने मुश्कील आहे तेथे जाऊन दगडी मंदिर बांधणारा व्यक्ती नक्कीच सामान्य माणूस नसावा असे आपल्याला स्वतः गेल्यावरच कळेल. ह्याचे चढण आणि वाट अतिशय अवघड असून तीन ते चार तासात आपण वर चढू शकतो. वाटेत कुठेही पिण्यासाठी पाणी मिळत नसून फक्त शेवटच्या टप्यावर एक विहीर लागते. त्या विहिरीचे पाणी मात्र थंड मधुर असून आपला सगळा थकवा नाहीसा करते. त्या विहिरीत असलेले सर्व प्राणी म्हणजे खेकडा, साप , बेडूक इ. सर्व लाल रंगाचे आहेत आणि मी प्रत्यक्ष पहिले आहेत . शिखरावर देवीचे मंदिर असल्यामुळे ह्याला तिथले लोक चमत्कार मानतात. कळसुबाई मंदिराचा कळस तेथूनच आपणास स्पष्ट पहावयास मिळतो . त्या आधी दोन तीन ठिकाणी लोखंडी शिड्या असून मध्ये मोठ मोठाले काळे दगड लागतात. ते पार केल्यावर हि विहीर आहे. त्या नंतरचा शेवटचा चढ म्हणजे आपली परीक्षाच आहे. त्याला लोखंडी साखळीचाही दुसरा मार्ग आहे मात्र सर्व सामान्य पायवाटेचा चढाच पसंत करतात. तो एकदा चढला कि आपण पोहोचतो सर्वोच्च शिखरावर. तो पर्यंत आपण आपल्यालाहि विसरतो. मला नेहेमी वाटते कि माणसातला अहंम नाहीसा व्हावा आणि आपण पूर्णतः भगवंतास लीन व्हावे ह्या साठीच देवी ,देवतांचे उंच गडावर किंवा शिखरावर स्थान असते. दर्शन घेतले कि आजूबाजूला फेरफटका मारता येतो.मागे कोकण कडा आहे. खोलवर मोठी दरी आहे. शिखराचा परिसर फारसा मोठा नसून वर सावलीलाही झाड नाही. ह्या देवीची दसरा-नवरात्रात यात्रा असते तेंव्हा अनेकजन त्या दरम्यान इथे येतात. रस्त्याने त्या काळात अनेक पिवळी मोहोरीची फुले, रान फुले असतात. आणि अनेक छोटे मोठे झरेही असतात मग हा सगळा परिसरच नवरात्रीच्या सणाचा नवा शालू नेसलेला असतो. जणू कळसुबाई देवीच्या नवरात्रीची तयारीच करतो.पण खरच आयुष्यात एकदा तरी संधी मिळाल्यास काळूबाई शिखरावर जावे. निसर्गाच्या भव्यतेचा मानवाच्या भावनेशी झालेला अनोखा संगम आपल्याला गडावर गेल्यावर आणि तिथल्या देवीचे दर्शन घेतल्यावर नक्कीच प्रकर्षाने जाणवतो.

मंगळवार, २३ मार्च, २०१०

"प्रेम केले पाहून"

काय? तुमचे लग्न ठरलय् ! जरा अवधी आहे बोहल्यावर चढायला? मी आज तुम्हाला माझे लग्न ठरले त्या नंतरच्या आठवणी सांगणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. माझे लग्न ठरले आणि मला म्हणजे माझ्या कवितेला निसर्गा पेक्षा प्रेम आवडू लागलं. कुणी महान आत्म्याने म्हटलेच आहे "लग्न पहावे करून" माझे लग्न ठरले तेंव्हा मी होते फक्त एकवीस वर्षाची. म्हणजे कायद्याने सज्ञान बर का! या वयात आपण वेगळेच असतो. सार आकाश मुठीत असल्यासारखे स्वच्छंद , अल्लड , भाबडे. सुरवंटाचे फुलपाखरू होताना त्यात बदल होतात तेच बदल मीही अनुभवत होते. त्याच काळात माझं लग्न ठरण म्हणजे माझ्या कवितेला कल्पनांपेक्षा प्रत्यक्ष अनुभवांची जोड मिळाली. आणि अनेक प्रेम कविता सुचल्या त्या कशा हे सांगतच मी तुमच्यासमोर त्या ठेवणार आहे. बघा तुम्हाला तुमच्या वाटतात का. कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला आणि पहिल्या नजरेतच प्रेम जडले. सकाळी नाशिकच्या गंगेची आंघोळीचे तीर्थ चढले आणि पहिल्या भेटीतल्या प्रेमाला लग्नाच्या बंधनात कैद केले.ह्यांचा रुबाब सेकंदात आवडला होता ,पण प्रेम इतक आंधळ असत हे लग्ना नंतर उमगलं. त्या आधी खूप सांगण्यासारखे आहे. लग्न ठरले कि सुरु होतात नवे स्वप्न, नवी ओढ मग समोर काय चाललय याच भान माणूस हरपून जातो समोर असतो फक्त देह. कारण मन तर गुंतलेले असते त्याच्यात. मग जळी, स्थळी दिसतो फक्त तोच. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस व्हायचा पण त्याच्या सहवासातल्या आठवणी सरत नसे. मग माझ कवी मन बोलू लागे " कातरवेळी तुझ्या आठवणींचे दाटते मनात धुके ओठांवरती गुणगुनते मी प्रीतीचे स्वर मुके." अशात ना तहान लागते ना भूक. समोर कोणी आले तरी त्याच्याशी बोलावेसे वाटत नाही. कोणी बोललेले कानात घुसत नाही. ध्यास असतो फक्त एकाच तो ,तो आणि तो. आम्ही प्रत्येक शनिवार- रविवार भेटत असू. मग दिवसभर सोबतच असायचो. हे मी आणि हिरोहोंडा कधीही थकलो नाही. उन नाही कि तहान नाही बस फक्त गप्पा. कधी आई बाबा काही विचारात ,सांगत पण कुणाचेही शब्द कानावर येत नसत, कारण मनात असायच्या आठवणी आणि हे शब्द. "तू नाही आसपास पण तुझा आभास होतो, मुक्या शब्दांच्या धुंदीत , तुझ्या स्पर्शाचा भास होतो." मग दिवस तरी एकवेळ सारायचा कसातरी पण रात्र, ती छळते. आपण तळमळत असतो, डोळ्यावर झोप असते, पण मन, ते थकत नव्हत. आस वाटे उडून याव ह्यांच्या जवळ, आपल्या प्रेमा जवळ. आणि मग पुन्हा कवितांचा शिडकावा मी माझ्या मनावर करत असे, त्यचाच आधार वाटे तेंव्हा. "तू माझा आहेस अस म्हणताना मनात काहीस होत तुला मी माझ म्हणटल्याच मनही ग्वाही देत." मग त्यांना आठवतांना जसे थकत नसे तशीच त्यांच्या विषयी बोलताना, त्यांना शब्दात मांडताना माझे शब्द थकत नसत. त्यांची प्रत्तेक भेट, त्यांचं बोलण, मला बघून एखाद गाण गुणगुणन ,सगळ आठवत असे आणि मी ते शब्दात टिपत असे. "तुझे प्रत्येक शब्द मला हवे हवेसे वाटतात. तुझ लाडिक बोलण, तुझ मधूनच भांडण, अस अचानक प्रेमात येण, अन मूडमध्ये येऊन गाणे गुणगुणन. सार सारख आठवत , सारच कित्ती छान वाटत." कुणी तरी आपल आहे, आपली वाट पाहत असते, आपल्यासाठी झुरत असते. तोच आपला आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार. हा किती छान अनुभव असतो म्हणून सांगू. कुणालाही आवडणारी ती अनुभूती असते. मग त्याच्या बरोबर आपण खूप वेळ घालवतो, त्याला समजून घेऊ लागतो. म्हणता म्हणता जवळीक वाढते आणि एकदा अचानक तो आपला हात हातात घेतो. मग लाजून आपले पाणी पाणी होते. असेच माझेही झाले आणि मग माझी कविता त्या लाजण्याचे कारण सांगते.... "तुझ्या हातात हात देताना पहिल्यांदा घाबरले होते, पण खरे सांगू मी क्षणभर मी बावरले होते, आता मात्र तुझ्या हाताचा स्पर्श जेंव्हा आठवतो तेंव्हा ह्या स्पर्शाशाठी माझाही हात सरसावतो." हळू हळू दिवस सरतात प्रत्येक भेट हि गोडच होते असे नाही. ‘राग’ हा प्रेमाचा जन्म सिद्ध हक्क आहे. मग थोडे रुसवे-फुगवे चालायचे. फोनवरही भांडणे व्हायची. पण आम्ही हे सारे थोड्याच वेळात विसरून जात असू . आणि पुन्हा मनात प्रेमाचा मयूर शब्दांचे पिसारे फुलवून नाचत असे. "तुझ प्रत्तेक बोलण माझ्या मनाला जाऊन भिडत, मग तुझ्या रागावरही माझे हृदय धडधडत." असेच दिवस प्रेममय झाले आणि म्हणता म्हणता लग्न घटिका जवळ आली. मी सजून, नटून मंडपात आले आणि सप्त पदीचे वचन आम्ही एकमेकांना दिले . मंत्राचा अर्थ ब्राम्हनालाच ठाऊक पण मी माझ्या शब्दातून तो वचनबद्ध केला. "तू माझा अन मी तुझी आहे. तुझी मला अन माझी तुला सातजन्म साथ आहे. सप्तपदी चालताना तुझ्या सोबत, तुझे मला अन माझे तुला हेच तर वचन आहे" संसाराचे स्वप्न सगळेच पाहतात ,तसे मी पण बघितले आणि शब्दात रंगवले सुद्धा ते असे. "आपला संसार छान असेल, स्वप्नांचा हलकासा ठाव असेल, एकमेकांची दोघांना साथ असेल, मिलनाची नित्य नवी रात असेल, आपला संसार आनंदाने बहरलेला असेल, आपला संसार छान असेल." पण संसारच स्वप्न हे त्याही पेक्षा विस्तृत आहे . आज लग्नाच्या सातव्या वर्षीही मी नेहमी बघते. संसारचे स्वप्न आणि प्रत्यक्षातला संसार ह्यात फार फरक असतो हे मात्र उमगलंय आता.कारण आता संसाराची धुरा खांद्यावर आहे आणि मला अभिमान वाटतो, आम्ही ती समर्थपणे सांभाळली. मतभेत , भांडणे होतातच पण सारे विसरून परत एकत्र येतो. हेच तर खर प्रेम आहे. नुसते आकर्षण म्हणजे प्रेम नसतेच मुळी प्रेम म्हणजे त्याग ,समर्पण, एकमेकांचा आदर ,सहनशीलता, तडजोड म्हणजे खरे प्रेम. भावनिक शब्दांच्या पलीकडली कविता म्हणजेच प्रेम आहे. आणि हेच माझ्या यशस्वी लग्नाच गुपित आहे.

सोमवार, २२ मार्च, २०१०

चैत्री पाडवा व चैत्रांगण

शुद्ध प्रतिपदेला संवत्सराचा प्रारंभ होतो. कृष्णाने गीतेत म्हंटले आहे कि “मी म्हणजे मार्गशीर्ष आहे!” कारण त्या शकात मार्गशीर्ष महिना हा प्रथम मानला जात असे.पण शालिवाहन राजाने सर्व शत्रूंचा नाश केला . परंपरे प्रमाणे चक्रवर्ती सम्राट जेंव्हा जिंकतो तेंव्हा तो आपली स्वतंत्र कालगणना तयार करतो. शालिवाहन राजाने स्वतंत्र शक सुरु केले ते 'शालिवाहन शक’.शालिवाहन शका पासून चैत्र महिना हा प्रथम मानला जातो. आपण आजही शालिवाहन शकच मानतो आहोत. या गोष्टीला आता १९३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी ब्रह्म देवाने सूर्योदयाचा वेळी सर्व सृष्टी निर्माण केली असे हेमाद्रीत ब्रहमवचन आहे . मराठी वर्षारंभ याच दिवशी होतो म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. आपण या दिवशी दारात गुढी उभारतो, दाराला तोरण लावतो,घरात आवडी प्रमाणे यथायोग्य गोडधोड करतो , दारात रांगोळी काढतो पण हि रांगोळी विशिष्ट प्रकारची असते तिला चैत्रांगण असे म्हणतात. पाडव्याच्या मुहूर्ताची वेळ साधून ती दर दारात पूर्वी काढत असे. आता वेळ, जागा सगळ्याचाच अभाव असल्याने अनेकांना हा प्रकार आपल्या संस्कृतीत असूनही माहित नाही. खरे सांगायचे तर मलाही बरेच दिवस हे माहित नव्हते पण अनेक पुस्तके ,लेख वाचून मी माहिती काढली आणि हे तुम्हालाही माहित व्हावे हाच या लेखाचा उद्देश आहे. सर्वप्रथम आपण गुढीचे महत्व बघू. गुढी म्हणजे यशाचे, प्रगतीचे प्रतिक तर आहेच पण 'वाचस्पती अभ्यंकर ' गुरुजींच्या मते गुढी म्हणजे आपला नव्या वर्षाचा प्रतीकात्मक संकल्प आहे. तिच्या प्रत्येक भागातून त्यांनी ह्याचे विश्लेषण केले आहे. गुढी ची "काठी" म्हणजे सरलतेचे प्रतिक आहे. तसेच काठी जशी उंच आकाशात जात असते तशी आपली प्रगती असावी. श्री.श्री. रवी शंकरजी म्हणतात,'माणसाने छोटे राहून मोठे काम करावे, मोठे असून छोटे काम करणे त्याला शोभत नाही.' हि शिकवण आपल्याला गुढीच्या काठीतून मिळते. काठीला कापड असते. कापड उभ्या आडव्या धाग्यांनी बनते. धागे नाजूक असतात पण एकमेकात घट्ट वीणल्यावर त्याचे सुरेख कापड तयार होते. हे धागे म्हणजे नाती. मग ती कौटुंबिक असोत कि सामाजिक ती घट्ट असली कि पक्की होतात व सुंदर दिसतात. म्हणून आपणही कुटुंबात समाजात असेच मिळून मिसळून राहायला हवे असे हे कापड सांगते. विशेषतः केशरी कापड घेतात, कारण ते आपल्या हिंदू धर्माचे प्रतिक आहे. त्यानंतर त्यावर कडू लिंबाची पाने व साखरेची गाठी लावली जाते.कडू लिंब आपल्या आरोग्यास अतिशय हितकारक असतो तो दारात बांधण्याने वातावरण शुद्ध होते. तसेच त्याची फुले आपण याच दिवशी धने व गुळ घालून खातो, त्याने रक्त व शरीर शुद्धी होते. लिंबाचा पाला गरम पाण्यात उकळून, त्याने आज स्नान करतात तेही आरोग्यासाठी हितकारक असते. तसेच कादुनिब आणि गोड साखरेची गाठी म्हणजे आपल्या कडू-गोड आठवणी आहेत. जीवन हे सुख आणि दुख: याचेच नाव आहे ह्याचे ते प्रतिक आहे. त्यावर शेवटी ‘ कलश’ पालथा असतो कारण आपल्या संस्कृतीत दानाला खूप महत्व आहे. आपले हात नेहमीच द्यायला असावेत. आपण देत राहावे.अश्या सुंदर शब्दात वाचस्पतींनी गुढीला नव वर्षाचा प्रतीकात्मक संकल्प म्हणून संबोधले आहे. चैत्रांगण म्हणजे काय असते नेमके? हा प्रश्न तुमच्यासारखाच मलाही कही दिवसांपूर्वी पडला होता. मग मी त्याची माहिती मिळवली. चैत्रांगण म्हणजे सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने किंवा भिंतीवर गेरूने काढलेले चित्र. हि आपली प्राचीन परंपरा आहे. या रांगोळीतून आपल्या संस्कृतीची आणि आपण मानत आलेल्या प्रतीकांचे, आपल्याशी असलेले नाते लक्षात येते. एका चौकटीत अनेक प्रतीकांना यांत स्थान आहे. त्यात प्रथम स्थापना होते गौरींची. चैत्र गौरीचे अनेक घरात ह्याच दरम्यान आगमन होते. देवळीच्या चौकटीतील जेष्ठा-कनिष्ठा गौरी, पाटावर श्रीचक्र, बाजूला दोन पंखे, शंख ,चक्र, गदा, पद्द्म, सुर्यनारायण, चंद्र ,गोपद ,स्वस्तिक, पावलं, तुळशी वृंदावन, नाग, कासव,फनी ,आरसा, करंडा,प्रवेशद्वार तोरण, हत्ती ,ओमकार इ.चिन्हे दर्शवली जातात. या शुभ चिन्हांच्या अस्तित्वाने दुष्ट प्रवृतींचा नाश होऊन आपले जीवन समृद्ध होते असा संकेत आहे. सूर्य तेजोमय आहे. निसर्ग चक्राचा,जीवनचक्राचा प्रमुख आधार आहे म्हणून त्याची पूजा हि हिंदू भक्तीने करतात. चंद्राच्या शीतलतेने घर उजळून जावे, शांती नांदावी हा हेतू चंद्र चिन्हाचा आहे तर गाईला आपण वासाल्याचे प्रतिक समजतो म्हणून गो पद्द्म काढतात. स्वस्तिक आपल्या संस्कृतीचे, मांगल्याचे प्रतिक आहे. करंडा,फनी,आरसा हे सारे सौभाग्याचे प्रतिक आहेत. शंख , चक्र, गदा हे विष्णूस वंदन सुचवते . तर कमळ म्हणजे वैभव, शोभा,सुचीत्व. ज्ञान यांचे प्रतिक म्हणून त्याची रांगोळी रेखाटतात.तुळस हि पूजनीय व बहुगुणी आशी आहे देवतांची ती आवडती आहे म्हणून तुळशीवृंदावन रेखाटले जाते. मुळात रांगोळी म्हणजेच संस्कृती. घरात आरोग्य, शांती समाधान नांदावे, वाईट विचारांना, प्रवृत्तींना घरापासून दूर ठेवण्यासाठी, शुभ्र रांगोळीचा वापर हिंदू संस्कृतीत प्रामुख्याने होतो. हि रांगोळी शुभ, सात्विकता, आनंदाचे, मांगल्याचे, आद्य आहे. घरात समृद्धी नांदावी, या साठी या प्रतीकांच्या रूपाने विधात्याची पूजा केली जाते व घरासमोरील रांगोळीतून आपल्या संस्कृतीच्या महानतेचे, समृद्धीचे आपण पूजांच करतो. मग काय चैत्रांगण काढणार ना आपण आपल्या दारात!