मंगळवार, ३० मार्च, २०१०

'माहेरची वाट'

डोंगराच्या कुशीत शिरणारा वळणदार नागमोडी रस्ता लागला, कि गाडी वळणा वळणावर हेलकावे घेऊ लागते,आणि मग सुरु माझ्या माहेरच्या वाटेचा खरा प्रवास. सागवान झाडांचे जंगल, उतरत्या छपरांचे ,गवती छताचे घर असलेली एखादी टुमदार वाडी, दत्त महाराजांच्या पायथ्याशी पहुडलेल्या कुत्र्यागत, डोंगराच्या पायथ्याशी शांत, निवांत भासते. शेतातल्या भाताचा दुधाळी सुगंध आसमंतात घुमत आसतो. शेतात शेतकरी त्याच्या कुटुंबा सोबत राबत असतो. पावसाळा असेल तर डोईवर इरलं असतं( म्हणजे पावसापासून बचाव होण्यासाठी घोंगडी वजा लाकडी पट्ट्यांचे बनवलेले छत.) आणि आपली गाडी वळण वळणं घेत मजल दरमजल करीत असते. सगळी कडे हिरवी दुलई पांघरलेले सह्याद्रीचे डोंगर आपल्याला वेड लावतात. शेत शेतातून वाहणारे झरे शेवटी रस्त्याच्या कडेला येऊन कोसळतात आणि त्याच्या खळखळाटात आपल्याला डोंगराचे गीत ऐकवतात. सह्याद्रीच्या कुशीत शिरताना आपल्याला तो त्याच्या बाहुपाशात सामावून घेतो आणि मग त्याच्या सौंदर्याच्या एक एक छटा दाखवायला सुरवात करतो. इगतपुरी ,घोटी सोडली कि याचा प्रत्त्यय आपल्याला यायला लागतोच. मी माझ्या पुढील काही लेखांमधून ह्याच परिसरातील अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणांची मला माहित आहे तेव्हडी माहिती आपणास सांगणार आहे.
'टाकेद'
प्रथम आपल्याला लागते ते 'टाकेद'. हा संपूर्ण परिसर ‘रामाच्या’ पदस्पर्शाने पावन झालेला आहे. जवळच नासिक पंचवटी असल्याने ‘टाकेद’ हे पवित्र तीर्थ स्थान आहे. हे गाव म्हणजे जटायु पक्षाचे पंख छाटले ते स्थान आहे. सीता हरण झाले तेंव्हा जटायु पक्षाने सीतेचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकला आणि हा पक्षी सीता मातेच्या मदतीला धावून आला त्याने रावणाशी झुंज दिली पण चलाख रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटले व तो या पवित्र स्थळी येऊन पडला.म्हणून या स्थानाला आणण्य साधारण महत्व आहे. त्या ठिकाणी एक जिवंत झरा आहे. महादेवाचे एक सुंदर मंदिर असून त्या समोर एक कुंड आहे. हे सर्व काळ्या पाषाणाचे आहे. तेथे बाहेर एक दगडी पिंड असून त्याच्या आत एक गोल गुळगुळीत दगड आहे, तो दगड जो एका हाताने वर काढतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी तिथली समजूत आहे. हा संपूर्ण परिसर सुंदर वृक्षांनी वेढलेला , अतिशय शांत आणि रमणीय आहे. झर्याचे पाणी वर्षाच्या बाराही महिने नित्य वाहत असते. त्याचा झुळझुळ असा आवाज आजही माझ्या कानात घोळतो आणि त्या परिसराची ओढ लावतो.
'कळसुबाई शिखर
' आपण ‘वासाळी’ घाट माथ्यावर आलो कि ‘नासिक’ जिल्हा संपून, ‘अहमदनग’ जिल्हा सुरु होतो. आणि आपले भव्य स्वागत होते ते सह्याद्री पर्वत रांगांमधील सर्वात उंच शिखर 'कळसुबाई.’ गाडी बारी गावाजवळ थांबते आणि मान उंचावून पहिले कि वर दिसते ते उंचच - उंच कळसुबाई शिखर. त्याच्या टोकावर ' कळसुबाई' चे मंदिर असल्याने त्याला हे नाव पडले आहे. बारी गावचा परिसर ह्या देवीच्या छत्र छायेत बहरलेला जाणवतो. बारी गावातून आपण शिखराच्या दिशेने प्रवास सुरु करतो. शेता शेतातून वाट काढत आपण पायथ्याशी पोहोचतो तिथे एक सुंदर देवीचे मंदिर आहे. कळसुबाई देवी आपल्याला जशी सुरवातीला भेटते तसेच शिखर सर केल्यावरहि तिचे मंदीर आहे.निसर्गाला आपल्याकडे देवी देवतांचे वरदान मानले जाते. त्याचा प्रत्यय या डोंगर माथ्यावरील छोट्याश्या पण सुरेख मंदिरावरून येतो. अंदाजे सोळा हजार फुट उंचावर असलेले हे मंदिर म्हणजे भक्तांच्या अगाध श्रद्धेचा साक्षात चमत्कारच वाटतो. आहो जेथे आपण स्वतःला सहजा सहजी जाने मुश्कील आहे तेथे जाऊन दगडी मंदिर बांधणारा व्यक्ती नक्कीच सामान्य माणूस नसावा असे आपल्याला स्वतः गेल्यावरच कळेल. ह्याचे चढण आणि वाट अतिशय अवघड असून तीन ते चार तासात आपण वर चढू शकतो. वाटेत कुठेही पिण्यासाठी पाणी मिळत नसून फक्त शेवटच्या टप्यावर एक विहीर लागते. त्या विहिरीचे पाणी मात्र थंड मधुर असून आपला सगळा थकवा नाहीसा करते. त्या विहिरीत असलेले सर्व प्राणी म्हणजे खेकडा, साप , बेडूक इ. सर्व लाल रंगाचे आहेत आणि मी प्रत्यक्ष पहिले आहेत . शिखरावर देवीचे मंदिर असल्यामुळे ह्याला तिथले लोक चमत्कार मानतात. कळसुबाई मंदिराचा कळस तेथूनच आपणास स्पष्ट पहावयास मिळतो . त्या आधी दोन तीन ठिकाणी लोखंडी शिड्या असून मध्ये मोठ मोठाले काळे दगड लागतात. ते पार केल्यावर हि विहीर आहे. त्या नंतरचा शेवटचा चढ म्हणजे आपली परीक्षाच आहे. त्याला लोखंडी साखळीचाही दुसरा मार्ग आहे मात्र सर्व सामान्य पायवाटेचा चढाच पसंत करतात. तो एकदा चढला कि आपण पोहोचतो सर्वोच्च शिखरावर. तो पर्यंत आपण आपल्यालाहि विसरतो. मला नेहेमी वाटते कि माणसातला अहंम नाहीसा व्हावा आणि आपण पूर्णतः भगवंतास लीन व्हावे ह्या साठीच देवी ,देवतांचे उंच गडावर किंवा शिखरावर स्थान असते. दर्शन घेतले कि आजूबाजूला फेरफटका मारता येतो.मागे कोकण कडा आहे. खोलवर मोठी दरी आहे. शिखराचा परिसर फारसा मोठा नसून वर सावलीलाही झाड नाही. ह्या देवीची दसरा-नवरात्रात यात्रा असते तेंव्हा अनेकजन त्या दरम्यान इथे येतात. रस्त्याने त्या काळात अनेक पिवळी मोहोरीची फुले, रान फुले असतात. आणि अनेक छोटे मोठे झरेही असतात मग हा सगळा परिसरच नवरात्रीच्या सणाचा नवा शालू नेसलेला असतो. जणू कळसुबाई देवीच्या नवरात्रीची तयारीच करतो.पण खरच आयुष्यात एकदा तरी संधी मिळाल्यास काळूबाई शिखरावर जावे. निसर्गाच्या भव्यतेचा मानवाच्या भावनेशी झालेला अनोखा संगम आपल्याला गडावर गेल्यावर आणि तिथल्या देवीचे दर्शन घेतल्यावर नक्कीच प्रकर्षाने जाणवतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा