सोमवार, २२ मार्च, २०१०

चैत्री पाडवा व चैत्रांगण

शुद्ध प्रतिपदेला संवत्सराचा प्रारंभ होतो. कृष्णाने गीतेत म्हंटले आहे कि “मी म्हणजे मार्गशीर्ष आहे!” कारण त्या शकात मार्गशीर्ष महिना हा प्रथम मानला जात असे.पण शालिवाहन राजाने सर्व शत्रूंचा नाश केला . परंपरे प्रमाणे चक्रवर्ती सम्राट जेंव्हा जिंकतो तेंव्हा तो आपली स्वतंत्र कालगणना तयार करतो. शालिवाहन राजाने स्वतंत्र शक सुरु केले ते 'शालिवाहन शक’.शालिवाहन शका पासून चैत्र महिना हा प्रथम मानला जातो. आपण आजही शालिवाहन शकच मानतो आहोत. या गोष्टीला आता १९३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी ब्रह्म देवाने सूर्योदयाचा वेळी सर्व सृष्टी निर्माण केली असे हेमाद्रीत ब्रहमवचन आहे . मराठी वर्षारंभ याच दिवशी होतो म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. आपण या दिवशी दारात गुढी उभारतो, दाराला तोरण लावतो,घरात आवडी प्रमाणे यथायोग्य गोडधोड करतो , दारात रांगोळी काढतो पण हि रांगोळी विशिष्ट प्रकारची असते तिला चैत्रांगण असे म्हणतात. पाडव्याच्या मुहूर्ताची वेळ साधून ती दर दारात पूर्वी काढत असे. आता वेळ, जागा सगळ्याचाच अभाव असल्याने अनेकांना हा प्रकार आपल्या संस्कृतीत असूनही माहित नाही. खरे सांगायचे तर मलाही बरेच दिवस हे माहित नव्हते पण अनेक पुस्तके ,लेख वाचून मी माहिती काढली आणि हे तुम्हालाही माहित व्हावे हाच या लेखाचा उद्देश आहे. सर्वप्रथम आपण गुढीचे महत्व बघू. गुढी म्हणजे यशाचे, प्रगतीचे प्रतिक तर आहेच पण 'वाचस्पती अभ्यंकर ' गुरुजींच्या मते गुढी म्हणजे आपला नव्या वर्षाचा प्रतीकात्मक संकल्प आहे. तिच्या प्रत्येक भागातून त्यांनी ह्याचे विश्लेषण केले आहे. गुढी ची "काठी" म्हणजे सरलतेचे प्रतिक आहे. तसेच काठी जशी उंच आकाशात जात असते तशी आपली प्रगती असावी. श्री.श्री. रवी शंकरजी म्हणतात,'माणसाने छोटे राहून मोठे काम करावे, मोठे असून छोटे काम करणे त्याला शोभत नाही.' हि शिकवण आपल्याला गुढीच्या काठीतून मिळते. काठीला कापड असते. कापड उभ्या आडव्या धाग्यांनी बनते. धागे नाजूक असतात पण एकमेकात घट्ट वीणल्यावर त्याचे सुरेख कापड तयार होते. हे धागे म्हणजे नाती. मग ती कौटुंबिक असोत कि सामाजिक ती घट्ट असली कि पक्की होतात व सुंदर दिसतात. म्हणून आपणही कुटुंबात समाजात असेच मिळून मिसळून राहायला हवे असे हे कापड सांगते. विशेषतः केशरी कापड घेतात, कारण ते आपल्या हिंदू धर्माचे प्रतिक आहे. त्यानंतर त्यावर कडू लिंबाची पाने व साखरेची गाठी लावली जाते.कडू लिंब आपल्या आरोग्यास अतिशय हितकारक असतो तो दारात बांधण्याने वातावरण शुद्ध होते. तसेच त्याची फुले आपण याच दिवशी धने व गुळ घालून खातो, त्याने रक्त व शरीर शुद्धी होते. लिंबाचा पाला गरम पाण्यात उकळून, त्याने आज स्नान करतात तेही आरोग्यासाठी हितकारक असते. तसेच कादुनिब आणि गोड साखरेची गाठी म्हणजे आपल्या कडू-गोड आठवणी आहेत. जीवन हे सुख आणि दुख: याचेच नाव आहे ह्याचे ते प्रतिक आहे. त्यावर शेवटी ‘ कलश’ पालथा असतो कारण आपल्या संस्कृतीत दानाला खूप महत्व आहे. आपले हात नेहमीच द्यायला असावेत. आपण देत राहावे.अश्या सुंदर शब्दात वाचस्पतींनी गुढीला नव वर्षाचा प्रतीकात्मक संकल्प म्हणून संबोधले आहे. चैत्रांगण म्हणजे काय असते नेमके? हा प्रश्न तुमच्यासारखाच मलाही कही दिवसांपूर्वी पडला होता. मग मी त्याची माहिती मिळवली. चैत्रांगण म्हणजे सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने किंवा भिंतीवर गेरूने काढलेले चित्र. हि आपली प्राचीन परंपरा आहे. या रांगोळीतून आपल्या संस्कृतीची आणि आपण मानत आलेल्या प्रतीकांचे, आपल्याशी असलेले नाते लक्षात येते. एका चौकटीत अनेक प्रतीकांना यांत स्थान आहे. त्यात प्रथम स्थापना होते गौरींची. चैत्र गौरीचे अनेक घरात ह्याच दरम्यान आगमन होते. देवळीच्या चौकटीतील जेष्ठा-कनिष्ठा गौरी, पाटावर श्रीचक्र, बाजूला दोन पंखे, शंख ,चक्र, गदा, पद्द्म, सुर्यनारायण, चंद्र ,गोपद ,स्वस्तिक, पावलं, तुळशी वृंदावन, नाग, कासव,फनी ,आरसा, करंडा,प्रवेशद्वार तोरण, हत्ती ,ओमकार इ.चिन्हे दर्शवली जातात. या शुभ चिन्हांच्या अस्तित्वाने दुष्ट प्रवृतींचा नाश होऊन आपले जीवन समृद्ध होते असा संकेत आहे. सूर्य तेजोमय आहे. निसर्ग चक्राचा,जीवनचक्राचा प्रमुख आधार आहे म्हणून त्याची पूजा हि हिंदू भक्तीने करतात. चंद्राच्या शीतलतेने घर उजळून जावे, शांती नांदावी हा हेतू चंद्र चिन्हाचा आहे तर गाईला आपण वासाल्याचे प्रतिक समजतो म्हणून गो पद्द्म काढतात. स्वस्तिक आपल्या संस्कृतीचे, मांगल्याचे प्रतिक आहे. करंडा,फनी,आरसा हे सारे सौभाग्याचे प्रतिक आहेत. शंख , चक्र, गदा हे विष्णूस वंदन सुचवते . तर कमळ म्हणजे वैभव, शोभा,सुचीत्व. ज्ञान यांचे प्रतिक म्हणून त्याची रांगोळी रेखाटतात.तुळस हि पूजनीय व बहुगुणी आशी आहे देवतांची ती आवडती आहे म्हणून तुळशीवृंदावन रेखाटले जाते. मुळात रांगोळी म्हणजेच संस्कृती. घरात आरोग्य, शांती समाधान नांदावे, वाईट विचारांना, प्रवृत्तींना घरापासून दूर ठेवण्यासाठी, शुभ्र रांगोळीचा वापर हिंदू संस्कृतीत प्रामुख्याने होतो. हि रांगोळी शुभ, सात्विकता, आनंदाचे, मांगल्याचे, आद्य आहे. घरात समृद्धी नांदावी, या साठी या प्रतीकांच्या रूपाने विधात्याची पूजा केली जाते व घरासमोरील रांगोळीतून आपल्या संस्कृतीच्या महानतेचे, समृद्धीचे आपण पूजांच करतो. मग काय चैत्रांगण काढणार ना आपण आपल्या दारात!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा