मी तुमची तुमच्यातलीच एक! घर, संसार हेच माझं विश्व. माझ्या मनाच्या शिंपल्यात दडलेले काही मोती तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मंगळवार, २३ मार्च, २०१०
"प्रेम केले पाहून"
काय? तुमचे लग्न ठरलय् ! जरा अवधी आहे बोहल्यावर चढायला?
मी आज तुम्हाला माझे लग्न ठरले त्या नंतरच्या आठवणी सांगणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. माझे लग्न ठरले आणि मला म्हणजे माझ्या कवितेला निसर्गा पेक्षा प्रेम आवडू लागलं. कुणी महान आत्म्याने म्हटलेच आहे "लग्न पहावे करून"
माझे लग्न ठरले तेंव्हा मी होते फक्त एकवीस वर्षाची. म्हणजे कायद्याने सज्ञान बर का! या वयात आपण वेगळेच असतो. सार आकाश मुठीत असल्यासारखे स्वच्छंद , अल्लड , भाबडे. सुरवंटाचे फुलपाखरू होताना त्यात बदल होतात तेच बदल मीही अनुभवत होते. त्याच काळात माझं लग्न ठरण म्हणजे माझ्या कवितेला कल्पनांपेक्षा प्रत्यक्ष अनुभवांची जोड मिळाली. आणि अनेक प्रेम कविता सुचल्या त्या कशा हे सांगतच मी तुमच्यासमोर त्या ठेवणार आहे. बघा तुम्हाला तुमच्या वाटतात का.
कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला आणि पहिल्या नजरेतच प्रेम जडले. सकाळी नाशिकच्या गंगेची आंघोळीचे तीर्थ चढले आणि पहिल्या भेटीतल्या प्रेमाला लग्नाच्या बंधनात कैद केले.ह्यांचा रुबाब सेकंदात आवडला होता ,पण प्रेम इतक आंधळ असत हे लग्ना नंतर उमगलं.
त्या आधी खूप सांगण्यासारखे आहे. लग्न ठरले कि सुरु होतात नवे स्वप्न, नवी ओढ मग समोर काय चाललय याच भान माणूस हरपून जातो समोर असतो फक्त देह. कारण मन तर गुंतलेले असते त्याच्यात. मग जळी, स्थळी दिसतो फक्त तोच. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस व्हायचा पण त्याच्या सहवासातल्या आठवणी सरत नसे. मग माझ कवी मन बोलू लागे
" कातरवेळी तुझ्या आठवणींचे दाटते मनात धुके
ओठांवरती गुणगुनते मी प्रीतीचे स्वर मुके."
अशात ना तहान लागते ना भूक. समोर कोणी आले तरी त्याच्याशी बोलावेसे वाटत नाही. कोणी बोललेले कानात घुसत नाही. ध्यास असतो फक्त एकाच तो ,तो आणि तो.
आम्ही प्रत्येक शनिवार- रविवार भेटत असू. मग दिवसभर सोबतच असायचो. हे मी आणि हिरोहोंडा कधीही थकलो नाही. उन नाही कि तहान नाही बस फक्त गप्पा. कधी आई बाबा काही विचारात ,सांगत पण कुणाचेही शब्द कानावर येत नसत, कारण मनात असायच्या आठवणी आणि हे शब्द.
"तू नाही आसपास पण
तुझा आभास होतो,
मुक्या शब्दांच्या धुंदीत ,
तुझ्या स्पर्शाचा भास होतो."
मग दिवस तरी एकवेळ सारायचा कसातरी पण रात्र, ती छळते. आपण तळमळत असतो, डोळ्यावर झोप असते, पण मन, ते थकत नव्हत. आस वाटे उडून याव ह्यांच्या जवळ, आपल्या प्रेमा जवळ. आणि मग पुन्हा कवितांचा शिडकावा मी माझ्या मनावर करत असे, त्यचाच आधार वाटे तेंव्हा.
"तू माझा आहेस अस म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझ म्हणटल्याच मनही ग्वाही देत."
मग त्यांना आठवतांना जसे थकत नसे तशीच त्यांच्या विषयी बोलताना, त्यांना शब्दात मांडताना माझे शब्द थकत नसत. त्यांची प्रत्तेक भेट, त्यांचं बोलण, मला बघून एखाद गाण गुणगुणन ,सगळ आठवत असे आणि मी ते शब्दात टिपत असे.
"तुझे प्रत्येक शब्द मला हवे हवेसे वाटतात.
तुझ लाडिक बोलण,
तुझ मधूनच भांडण,
अस अचानक प्रेमात येण,
अन मूडमध्ये येऊन गाणे गुणगुणन.
सार सारख आठवत ,
सारच कित्ती छान वाटत."
कुणी तरी आपल आहे, आपली वाट पाहत असते, आपल्यासाठी झुरत असते. तोच आपला आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार. हा किती छान अनुभव असतो म्हणून सांगू. कुणालाही आवडणारी ती अनुभूती असते. मग त्याच्या बरोबर आपण खूप वेळ घालवतो, त्याला समजून घेऊ लागतो. म्हणता म्हणता जवळीक वाढते आणि एकदा अचानक तो आपला हात हातात घेतो. मग लाजून आपले पाणी पाणी होते. असेच माझेही झाले आणि मग माझी कविता त्या लाजण्याचे कारण सांगते....
"तुझ्या हातात हात देताना
पहिल्यांदा घाबरले होते,
पण खरे सांगू मी क्षणभर मी बावरले होते,
आता मात्र तुझ्या हाताचा स्पर्श जेंव्हा आठवतो
तेंव्हा ह्या स्पर्शाशाठी माझाही हात सरसावतो."
हळू हळू दिवस सरतात प्रत्येक भेट हि गोडच होते असे नाही. ‘राग’ हा प्रेमाचा जन्म सिद्ध हक्क आहे. मग थोडे रुसवे-फुगवे चालायचे. फोनवरही भांडणे व्हायची.
पण आम्ही हे सारे थोड्याच वेळात विसरून जात असू . आणि पुन्हा मनात प्रेमाचा मयूर शब्दांचे पिसारे फुलवून नाचत असे.
"तुझ प्रत्तेक बोलण माझ्या मनाला जाऊन भिडत,
मग तुझ्या रागावरही माझे हृदय धडधडत."
असेच दिवस प्रेममय झाले आणि म्हणता म्हणता लग्न घटिका जवळ आली. मी सजून, नटून मंडपात आले आणि सप्त पदीचे वचन आम्ही एकमेकांना दिले . मंत्राचा अर्थ ब्राम्हनालाच ठाऊक पण मी माझ्या शब्दातून तो वचनबद्ध केला.
"तू माझा अन मी तुझी आहे.
तुझी मला अन माझी तुला सातजन्म साथ आहे.
सप्तपदी चालताना तुझ्या सोबत,
तुझे मला अन माझे तुला हेच तर वचन आहे"
संसाराचे स्वप्न सगळेच पाहतात ,तसे मी पण बघितले आणि शब्दात रंगवले सुद्धा ते असे.
"आपला संसार छान असेल,
स्वप्नांचा हलकासा ठाव असेल,
एकमेकांची दोघांना साथ असेल,
मिलनाची नित्य नवी रात असेल,
आपला संसार आनंदाने बहरलेला असेल,
आपला संसार छान असेल."
पण संसारच स्वप्न हे त्याही पेक्षा विस्तृत आहे . आज लग्नाच्या सातव्या वर्षीही मी नेहमी बघते. संसारचे स्वप्न आणि प्रत्यक्षातला संसार ह्यात फार फरक असतो हे मात्र उमगलंय आता.कारण आता संसाराची धुरा खांद्यावर आहे आणि मला अभिमान वाटतो, आम्ही ती समर्थपणे सांभाळली. मतभेत , भांडणे होतातच पण सारे विसरून परत एकत्र येतो. हेच तर खर प्रेम आहे. नुसते आकर्षण म्हणजे प्रेम नसतेच मुळी प्रेम म्हणजे त्याग ,समर्पण, एकमेकांचा आदर ,सहनशीलता, तडजोड म्हणजे खरे प्रेम. भावनिक शब्दांच्या पलीकडली कविता म्हणजेच प्रेम आहे. आणि हेच माझ्या यशस्वी लग्नाच गुपित आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खूप सुंदर लेख आहे. आम्ही दोघांनी एकत्र वाचला. जयश्रीला खूप आवडला. फक्त आकर्षण म्हणजे प्रेम नाह्वे हा नवीन पिढीला खूप चांगला संदेश आहे. आम्ही पण आमच्या भूतकाळात जाऊन आलो.
उत्तर द्याहटवातुम्हाला आमच्या शुभेच्छा. असेच लिहून आम्हाला स्फुरण देत जा.. अभिनंदन