मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

सिंहाचा छावा

आज छवा पाहिला आणि मराठी रक्त उसळून आलं.. विकी कौशल मराठी नसला तरी मराठी मातीतला आहे, आणि त्यामुळेच की काय भूमिकेला संपूर्णपणे न्याय देत त्याने छवा साकारला आहे असं वाटलं. बुऱ्हानपूरची लढाई दाखवताना वाळी घालून दौडत आलेल्या घोड्यावर राजे संभाजी यांची प्रथम झलक अंगावर शहारा आणते. त्यानंतरची लढाई ने आपल्या समोर मर्द मराठा कातळ शरीर उभे करून, सरदारांची व मावळ्यांची आपल्या स्वराज्यावर असलेली निष्ठा तंतोतंत उभारण्यात ही फिल्म अतिशय यशस्वी झाली आहे. लढाईनंतर बऱ्हाणपूरचे झालेले हाल अतिशय बारकाव्याने दाखवले आहेत. त्यातील एक दृश्य छोट्या बाळाला आईकडे देताना संभाच्या मनात मायेचा फुटलेला पाझर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.आईविना वाढलेल्या शंभूराजांची विकल अवस्था त्या वेळी झळकते. या लढाईचा उद्देश खजिना गोळा करणे हा नसून छत्रपतींच्या जाण्यानंतर औरंगजेबला जरब बसविणे आहे हा संदेशही उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला आहे. लढाईनंतर येसूबाई भेटल्यावर तिच्या पाणीदार डोळ्यांमध्ये पती संभाजी बद्दलचा विश्वास दाखवताना रश्मिका मंडला च्या नजरेतून साक्षात येसूबाई झळकली आहे.आबासाहेबांना अखेरच्या क्षणी भेटता न आल्याची खंत हेरून येसूबाईंनी कवड्यांची माळ जिरे टोप व मोजडी दाखवून शंभू राजेंना घडवून आणलेले छत्रपतींचे दर्शन मन पिळवटून टाकते. शंभू बाळा आता राज्याभिषेक कर!! हा दिलेला आबासाहेबांचा मुक आदेश "शब्दा वाचून कळलेसारे शब्दांच्या पलीकडले" या गाण्याप्रमाणे मनातले नेमके भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास ही फिल्म यशस्वी झाली आहे. त्यानंतर सिंहासनावर बसलेले शंभू राजे सिंहासनाकडे चालत असताना आपल्या अंगावर शहारा आणतो. शंभूराजांनी त्यासाठी आपल्याच घरात लहानपणापासून सोसलेला त्रास. आईविना वाढलेलं पोर, धारावू आईच्या दुधावर निपजलेला छवा. हंबीर मामांचा शंभू छत्रपती होतो.राज्याभिषेका नंतर जेवतानाचा चित्रित केलेला प्रसंग, ज्यात येसूबाईंचे दोन्ही बंधू गणोजी व कान्होजी संभाजी राजेंना कोकण प्रांत मागतात त्यानंतर येसूबाईंनी छत्रपती राजे शिवाजी यांची आठवण करून देत "आबासाहेब म्हणायचे, की प्रत्येकाला असे स्वातंत्र्य दिले तर जो तो आपल्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार करील ते नेहमी या गोष्टीच्या विरुद्ध होते." हे दिलेले उत्तर येसूबाईंच्या आदर्श राजकारणाची झलक दाखवतात. तर गणोजी कानोजी च्या डोक्यातील बंडाची तिथेच पडली हे समजते. सोयराबाईंचे राजारामाप्रती प्रेम त्यासाठी अकबराशी हात मिळवणी व फितूरीचे पत्र त्यानंतर सजा म्हणून अनाजी दत्तो, बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पाया खाली दिले असे काही प्रसंग उत्तमरीत्या चित्रित केले आहेत. सोयराबाईचा अंत व त्यातच राजारामासाठी हंबीररावांच्या मुलीचा ताराबाईचा मागितलेला हात, हे सारे प्रसंग उत्तमरीत्या गोवले आहेत. आता चित्रपट संगमेश्वर च्या दृश्यांपर्यंत येऊन ठेपतो. तिथे संभाजी राजे यांच्यावर दगा होऊन त्यांना साखळ दंडाने बांधून औरंगजेब समोर उभे करण्यापर्यंत साकारलेला सिंहाचा छवा आपल्यासमोर रौद्ररूपात, साक्षात भोलेनाथाचा अंश म्हणून उभा राहतो. आपल्या हाताच्या मुठी आवळल्या जातात, पायातून रक्त सळसळत मेंदूपर्यंत जाते, डोळ्यातून अश्रूंची धारा वाहत असूनही, डोळे बंद न करता आपण ते दृश्य पाहत,रगा रगातून सळसळणाऱ्या रक्ताचा अनुभव घेतो. आपणही त्या क्षणी संगमेश्वरच्या त्या तटावर झालेल्या लढाईत अदृश्य स्वरूपात सामील होतो. समुद्रासारख्या मुघली फौजेवर तुटून पडलेला राजा आपल्या धमन्यातील हिंदुत्व चेतवतो आणि निपचीत पडलेला आपला धर्मभाव आता सळसळता हुंकार भरायला लागतो. समोर चाललेले दृश्य हा एक चित्रपट आहे हे आपल्याला क्षणभर विसरायला होते. राजे तुम्ही लढा.... आम्ही पण तुमच्या सोबत आहोत...लढा राजे लढा !!असे शब्द बाहेर पडतात. संभाजी राजेंना साखळ दंडाने बांधून नेताना साखळ दंडाचे वळ आपल्या मनावर रुतलेल्या ची असह्य वेदना जाणवायला लागते . त्यानंतर औरंग्या समोर आल्यावर काटेरी नजरेतून त्याच्यावर झेपावणारा छवा, धर्मरक्षक संभाजी राजांचा दृढनिश्चय प्रेक्षक अवाक होऊन पाहतो. कवी कलश म्हणजेच संभाजी राजांचा 'छंदोगामात्य' यांची शंभूराजांवर केलेली कविता त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवते, तर औरंग्यावर शब्दरूपी तीर चालवते. फौज तो तेरी सारी हैं, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा... अब भी सब पे भारी है।', म्हणत कवी कलश त्याला उत्तर देतो आणि आपल्याही अंगावर शहरा येतो. राजांबरोबरची शेवटची काव्य जुगलबंदी व शंभूराजेंनी "कवी तूम नमक नही चंदन-तिलक हो!" म्हणत कवी कलश यांच्या मित्रत्वाचा केलेला सन्मान... तर मै तिलक नही नमक हू,जो शत्रु के घाव पर लगे.. .. असे नमक ही कवींनी शत्रूवर सोडलेले उपहासात्मक शब्दरूपी बाण आपल्या मनाला दिलासा देतात. त्यानंतर सगळे जे घडते ते खूपच वेदनादायक पण वास्तव आहे कदाचित जे दाखवले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर सत्य इतिहासात दडलेले असेल. पण पुढचे हे दृश्य बघायला मी मात्र थेटरमध्ये थांबूच शकले नाही. 11 मार्च असतो दिवस ज्या दिवशी अतोनात हाल सहन करून शिवरायांचा हा बाळ शरीराचे अतोनात हाल सहन करून भीमा इंद्रायणीच्या तीरावर शांत निजला... कवी कलशांचे अखेरचे काव्य यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।। ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग । त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।। सौ शितल जाखडी, ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा