मी तुमची तुमच्यातलीच एक! घर, संसार हेच माझं विश्व. माझ्या मनाच्या शिंपल्यात दडलेले काही मोती तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
गुरुवार, २७ जानेवारी, २०११
"आई नसताना,आई ग!"
आई हा शब्द उच्चारायला आपण लहान असल्यापासूनच लागतो पण त्याचा खरा अर्थ कळतो तो स्वतः आई झालो की.
"तू आई झाल्या शिवाय नाही कळायची माझी भावना तुला!" असे मला लहानपणी आई कितीदा म्हणत असे.
आणि मी म्हणायचे हो का, त्यात काय मोठे?. पण आज लग्नाच्या सातव्या वर्षी हि आई होण्यापासून वंचित राहिलेली मी
त्या आई होण्याचा अनुभव नाही घेऊ शकत. त्यात किती समाधान असते किती आनंद असतो याची फक्त कल्पनाच करू शकते.
अगदी बीज अंकुरल्या पासून ते कळा देतानाच्या वेदने पर्यंतचा प्रवास. त्यातील नावागताची जाणीव. त्याचा आभास. मग त्यासाठीची तयारी या सगळ्याचा
नुसता विचार सुद्धा माझ्या मनाला मोहरून टाकतो. आई ला पान्हा कसा फुटत असेल? याची कल्पना मला शहारून सोडते आणि माझ्या अनामिक भावनेला
पाझर येतो. ती भावना कशी असेल याच्या लक्ष वेळा मी कल्पना केल्या असतील पण त्याची प्रत्यक्ष अनुभूतीची मी आतुरतेने वाट बघत आहे.
गर्भात असताना आई ला डोहाळे लागतात म्हणतात. त्या डोहाळ्यावरून पाहुणा तो असेल का ती ह्याचा अंदाज मग घरातल्या वयस्कर बायका लावतात.
मग त्या वरून उगाच चीडवणेही होते. पण आई ला मात्र ओढ असते ती फक्त आपल्या बाळाच्या जन्माची. मग ते तो असो की ती आई ला काही फरक पडत नाही हे मात्र खात्रीने सांगू शकते.
बाळ घरात दुडू धावत आहे. हट्ट करत आहे. हे भास तर नित्याचे आहे कदाचित आज पर्यंत ह्या भासामुळेच आपल्याला आई होण्याच्या इच्छे पासून दूर केले नसावे. कारण आयुष्याच्या स्वर्णिम तरुणाईचे सारे दिवस मी ह्या एकाच ध्यासा पोटी उगाचच नसते वाया घालवले. परदेशात म्हणे बायकांना लग्न करायची इच्छा असते पण आई होण्याची नाही. का तर म्हणे त्यांना ती नसती जवाबदारी वाटते. पण मला ह्या विधानात जास्त तथ्य वाटत नाही कारण मी स्वतः अनुभवत आहे की आई होण्याची भावना एका स्रीत किती काठोकाठ भरलेली असते आणि म्हणूनच तर एकदा आई झालेल्या कितीतरी बायका पुन्हा आई होऊ इच्छितात. त्यांनी तर कळांच्या
मरणयातना सोसलेल्या असतानाही त्यांना पुन्हा इच्छा होतेच ना.
त्या बाळाचे आगमन त्याची शी ,शु काढणे, रात्री रात्री जागून त्याला वाढवणे, त्याचे बोबडे बोल, अडखळणारे पाऊल आणि सावरायला आलेले आपले किंवा त्याच्या बाबांचे हात हे सगळे प्रत्येक आईचे स्वप्न असते.मीही त्याहून वेगळी नाही.
पण निसर्गापुढे म्हणजेज नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे.आपण म्हणत असलेली नियती मग नशिबाचा भाग बनते आणि सत्य स्वीकारण्या शिवाय गत्यंतर उरत नाही.असो पण हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर लाखो लोकांच्या बाबतीत होते आणि मग हिरमुसलेली नाती लग्नाच्या बंधनातील ओझे वाटायला लागतात.प्रत्येक महिन्याला वाटत असणारी आशा पाळीच्या आगमनाने मावळते आणि अश्रूंच्या सानिध्यात पुन्हा पुढच्या पाळीच्या चुकण्याची आस प्रज्वलित करून ती सावरते.कुणी हा डॉक्टर सांग कुणी तो, कधी आयुर्वेदिक तर कधी होमियोप्याथी.हे सारे कमी म्हणून जोतीशी म्हणू नका की बुआ अगदी सगळे पुन्हा पुन्हा करून कंटाळा आला की अलोप्याथीची हमीची कास पकडतो आणि आपल्याला वाटते सुटलो आता, आय.यु.आय. नाही तर आय.व्ही.एफ करून टाकले की संपला विषय आणि मग त्यात पडले की त्यातलेही खरे सत्य बाहेर येते मग पैश्या बरोबर मनस्ताप होतो तो वेगळाच.(हा माझा स्वतःचा हि अनुभव आहे ) आतुरलेल्या माझ्या मैत्रीणीनो आपण आता धिराने घ्यायलाच हवे जे आपल्या हातात नाही, ज्यात आपला दोष नाही अश्या गोष्टींचा काथ्याकुट करून आपल्या तरुण पणाचे सारे दिवस दवाखान्याच्या चक्रांमध्ये घालवून व शरीराला औषध गोळ्यांच्या भडीमारापासून आता वाचवायला हवे. नाही तर एक मिळवण्याच्या ध्यासा साठी बहुमुल्य शरीर , मन आणि वेळ सगळ्याचाच नाश होईल आणि उधिष्ठ सफल झाल्यावर त्याचा आनंद घ्यायलाहि आपले त्राण राहणार नाहीत. कदाचीत माझे विचार आपल्याला थोडे प्रक्टिकल वाटतील, पण हो हेच सत्य आहे. आपण वेळीच जागरूक व्हायला हवे एखाद्या नश्वर ध्यासापोटी आपण अजून किती काळ झगडायचे.आपले जीवन बहुमूल्य आहे. आपल्याला ह्या जीवनाचा अन्य रीतीने आस्वाद घेता येईल. सगळ्यांना जे मिळाले ते आपल्याला का नाही ह्या निरर्थक हट्टा पोटी किती काळ आपण ह्या चक्रात अडकायचे याचा जरा शांतपणे विचार करा आणि योग्य वेळीच त्याला सावरा. समाज, कुटुंब,रितीरीवाज सगळ्याला मात देऊन जरा आपल्या स्वतःचा विचार घ्या नक्कीच तुम्हाला माझे म्हणणे पटेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा